उद्यापासून रंगणार कोथरूड नवरात्र महोत्सव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
संजीव अरोरा, मनोज हिंगोरानी, अरुण जिंदल ह्या उद्योजकांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल – संदीप खर्डेकर
विविध सामाजिक संस्थांना मदतीचा हात ही देणार – विशाल भेलके.
कोथरूड : उद्या 3 ऑक्टोबर रोजी भेलकेवाडी, डी पी रस्ता, परांजपे शाळेसमोर, कोथरूड येथे सकाळी 11 वाजता वाघजाई देवीची घटस्थापना होऊन कोथरूड नवरात्र महोत्सवास सुरुवात होईल. यावेळी एकदंत वाद्य पथक यांचे देवीच्या मंडपासमोर स्थिर वादन होणार आहे.
महोत्सवादरम्यान केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर न देता विविध सामाजिक संस्थांना उपयोगी साहित्याची मदत,भोर येथील करंदी गावातील येसाजी कंक शाळेला शालेय साहित्याची मदत करण्यात येणार असल्याचे महोत्सवाचे संयोजक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके, विश्वस्त उमेश भेलके तसेच युवा उत्सव प्रमुख प्रतीक खर्डेकर यांनी सांगितले.
महोत्सवादरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्याच्या उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ग्लोबल ग्रुपचे संस्थापक संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी, तसेच वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे संचालक अरुण जिंदल यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संदीप खर्डेकर यांनी सांगितले. संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी हे अस्सल पुणेकर असून त्यांनी ग्लोबल ग्रुपच्या माध्यमातून तब्ब्ल 100 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय उद्योगांना पुणे, चाकण, हिंजेवाडी, रांजणगाव, सणसवाडी इ ठिकाणी Built to Suit जागा दीर्घाकालीन काळासाठी लीज वर उपलब्ध करून दिली आणि त्यायोगे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अरुण जिंदल यांनी देखील वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या माध्यमातून रोजगार निर्मिती व आर्थिक चलनास गती दिल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे असे खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
ह्या महोत्सवादरम्यान दिनांक 5 ऑक्टोबर ला रात्री 9 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात “गेम ऑफ पॉवर ” ह्या राजकीय विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल तर दि. 6 ऑक्टोबर ला दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सिनेतारका, लावणी क्वीन अर्चना सावंत यांचा “अप्सरा आली” हा लावण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात येईल अशी माहिती महिला उत्सव प्रमुख माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके, अक्षदा भेलके आणि कल्याणी खर्डेकर यांनी दिली.
वरील कार्यक्रम मोफत असून प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर सर्वांना नाट्यगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच 8 ऑक्टोबर ला बालजत्रा, 9 ऑक्टोबर ला भोंडला आणि महिलांची महाआरती आणि तृतीयपंथीयांना साडी भेट, 11 व 12 ऑक्टोबर ला रासदांडिया आणि 16 ऑक्टोबर ला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दुग्धपान व दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.