वसंत मोरे राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत?

मुंबई : पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात स्पीकर लावणार नाही, ही ठाम आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेचे एकीकडे स्वागत होत असले तरी पक्षांतर्गत मात्र विरोध होताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेनंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.
भोंग्यांवर वसंत मोरेंचं म्हणणं काय?
मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. राज ठाकरे यांच्याशी आपले बोलणे झालेले नाही. त्यांनी बोलावले तर भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचे आहे, असेही ते म्हणाले होते. तर त्यामुळे आलेल्यांनी मला सांगू नये, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पीकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका त्यांनी पक्षाच्याच सहकाऱ्यांवर विशेषत: प्रदेश सरचिटणीस असलेले हेमंत संभूस यांच्यावर केली.
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नाराज झालेल्या मनसेच्या काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी या कार्यकर्त्यांची भेटही घेतली. फेसबुक पोस्टही केली. एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही, त्यांच्या या वाक्याचे वेगवेगळे संदर्भ घेतले जात आहेत. हा अप्रत्यक्ष इशाराही मानला जातोय.
आपल्या वादग्रस्त भूमिकेनंतर मनसेत पक्षांतर्गत वाद उफाळले आहेत. राज ठाकरे यावर काय उत्तर देतात, याविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 9 तारखेला ते उत्तर देणार आहेत.




