राहुल गांधीच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपला धडकी : नाना पटोले

मुंबई : “भाजपचे भय संपत नाही.! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपचे भय संपत नाही आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे १० लाख रुपयांचा सुट परिधान करतात.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
भाजपने राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या ट्विटला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या सुटबद्दल चर्चा करायची का? असं आव्हान देखील दिलं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “भारत जोडो यात्रेला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून घाबरला काय. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर चर्चा करा. बाकी कपड्यांवर चर्चा करायची झाली, तर मोदींचा १० लाख रुपयांचा सुट आणि १.५ लाख रुपयांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल,” असं सडेतोड उत्तर काँग्रेसने दिलं आहे.
राहुल गांधी नेहमी कुर्ता आणि पायजम्यामध्ये सर्वांना दिसतात. पण, भारत जोडो यात्रेच्या प्रवासावेळी त्यांनी टी-शर्ट आणि पँट घातली आहे. त्यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किंमतीवरून भाजपाने राहुल गांधींवर टीका केली. त्यानंतर कॉंग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिलं.




