भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान

लंडन : ब्रिटनचं राजकारण लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा पंतप्रधान होण्यासंदर्भातील शक्यतांचा अंदाज घेत रिंगणातून माघार घेतली होती. ऋषी सुनक यांच्यासमोर आणि पेनी मॉर्डंट यांचं आव्हान होतं. मात्र, पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत. ऋषी सुनक आता ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असणार आहेत. इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. सुनक यांनी यापूर्वी अर्थमंत्री म्हणून देखील काम केलं आहे.

पेनी मॉर्डंट यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानं ऋषी सुनक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर लढत झाली होती. मात्र, आर्थिक आघाडीवर अपयश आल्यानंतर लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला. ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर आता ऋषी सुनक यांची पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांनी २०१५ मध्ये राजकारणात पाऊल ठेवलं होतं. अवघ्या सात वर्षांच्या काळात त्यांनी सर्वोच्च पदापर्यंत झेप घेतली आहे.



































































































