शरद पवारांनी घातलं पुण्यात लक्ष

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांना अपयश येत आहे. नेमके काय चालू आहे हे समजण्यास मार्ग नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा स्वतः आढावा घेत अधिकाऱ्यांशी व शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा कली.
पवार यांनी उपाययोजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी नेहमीचीच उत्तरे दिली. त्यामुळे नेमक्या अडचणी काय आहेत, प्रशासनाची भूमिका काय आहे आणि आपण नेमकं काय करायला हवं या बाबतीमध्ये पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसेच कार्यकर्त्यांनी आता रस्त्यावर उतरून लोकांना मदत करावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
“एन सी पी पुणे सिटी कोविड हेल्पलाइन”
राष्ट्रवादी पक्षातर्फे पुण्यातील ८ मतदार संघांमध्ये “एन सी पी पुणे सिटी कोविड हेल्पलाइन” सुरू करावी. त्या ठिकाणावरुन रुग्णांना सर्व हॉस्पिटलची अद्यावत माहिती देण्याची व्यवस्था करावी, काही प्रमुखांवर तिची जबाबदारी देऊन त्यांनी हॉस्पिटल शी संपर्क साधून रुग्णांना दाखल करून घेणे बाबत मदत करावी. याशिवाय या ८ ही मतदारसंघांमध्ये सुसज्ज अशा ॲम्बुलन्स यामध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांची सुविधा असेल, गंभीर रुग्णांसाठी या अँबुलन्स चा उपयोग करावा याबाबतीतील जबाबदारी या क्षेत्रात काम केलेल्या वैद्यकीय अधिकार्याला द्यावी आणि सर्व यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यान्वित आणावी असे आदेश पवार यांनी दिले आहेत. याचबरोबर रुग्णांसाठी आवश्यक असलेली रेमेडिसवर इंजेक्शन गरीब रुग्णांना द्यावी, अशी 150 इंजेक्शन्स पवार यांनी चेतन तुपे यांचेकडे सुपूर्त केली. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसातले अनुभव उपस्थितांनी साहेबांच्या कानावर घातले, या बैठकीला खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ उपस्थित होते.



