पुणे शहर

पुण्याचे माजी उपमहापौर नंदकुमार मोझे यांचे निधन

पुणे : माजी उपमहापौर नंदकुमार उर्फ नंदू धाकू मोझे (वय 72) यांचे मंगळवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


नंदकुमार मोझे 1992 मध्ये पुणे महापालिकेत येरवडा विभागातून काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले होते. पुणे महापालिकेचे सभासद, स्थायी समिती सदस्य तसेच 1996-97 साली उपमहापौर म्हणून त्यांनी काम केले. तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या गाडगीळ गटाचे ते सक्रिय सदस्य होते. तसेच माजी महापौर हंबीरराव मोझे, माजी आमदार प्रकाश ढेरे यांचे ते निकटवर्तीय होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे महापालिकेच्या पीएमटी मध्ये कंडक्टर म्हणून देखील काम केले. त्यानंतर 1995 साली येरवडा वार्डातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवून ते विजयी झाले. 1997 मध्ये देखील त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांना अपयश आले.

उपमहापौर पदानंतर देखील त्यांचा सामाजिक राजकीय कार्यात अखेरपर्यंत सक्रिय सहभाग होता. सोमवारी सायंकाळी त्यांना उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कुटुंबीयांसह नातेवाईक मित्रपरिवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता येरवडा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये