Russia Ukraine War : अमेरिकेकडून रशियाच्या अभूतपूर्व आर्थिक कोंडीचा इशारा

न्यूयॉर्क : युक्रेनच्या युद्धभूमीवर रशिया कदाचित उजवी ठरेल पण त्यांना या सगळ्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिला आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीत रशियन विमानांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे रशिया कधी नव्हे इतका एकटा पडल्याचे जो बायडन यांनी म्हटले आहे. युक्रेनमधील युद्धात अमेरिकन फौजा सहभागी होणार नाही. मात्र, युरोपमधील नाटो देशांच्या रक्षणासाठी अमेरिकन लष्कर हे कटिबद्ध असेल. आम्ही नाटोच्या एक-एक इंच भूभागाचे रक्षण करू, असे बायडन यांनी म्हटले आहे. जो बायडन यांनी अमेरिकन संसदेत केलेल्या भाषणात आपण युक्रेनच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे जाहीर केले. यावेळी बायडन यांनी आगामी काळात रशियाची अभूतपूर्व आर्थिक कोंडी होईल, असा इशाराही दिला आहे.

जो बायडन यांनी युक्रेनच्या सैन्याची मुक्तकंठाने तारीफ केली. युक्रेनियन फौजा शौर्याने लढत आहेत. व्लादिमीर पुतीन यांना आपण युक्रेनला सहज चिरडू, असे वाटले होते. पण युक्रेनध्ये त्यांना अनपेक्षित धक्का बसला. पुतीन यांनी युक्रेनवर पूर्वनियोजित आणि कारण नसता हल्ला केला. जेव्हा हुकूमशाहांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावी लागत नाही तेव्हा ते आणखी विध्वंस करतात. त्यामुळे अमेरिका आणि युरोपियन महासंघ एकत्र येऊन रशियाला प्रत्युत्तर देईल. हा लढा आणखी काही काळ चालेल, असेही जो बायडन यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि युरोपियन महासंघातील 27 देश एकत्र आले आहेत. त्यांच्याकडून रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियन अब्जाधीशांची अमेरिका आणि युरोपमधील सर्व संपत्ती जप्त केली जाणार आहे. या आर्थिक निर्बंधामुळे रशियाचे रुबल या चलनाचा भाव 30 टक्क्यांनी घसरला आहे. तर भांडवली बाजार जवळपास 40 टक्क्यांनी कोसळला आहे.



