प्रभाग रचनेवरून राज ठाकरे यांचे मोठ वक्तव्य..

मुंबई : महापालिका निवडणुकांमध्ये दोनचा, तीनचा, चारचा प्रभाग करणं हे साफ चुकीचं. ह्यात फक्त नगरसेवक गब्बर होतो आणि शहरं बकाल होतात. ह्या व्यवस्थेत नक्की कोणाला जबाबदार धरायचं हेच नागरिकांना कळत नाही. मुंबईत जर प्रभाग पद्धत नाही तर ती इतर शहरांमध्ये का? हे असले प्रकार बंद व्हायला हवेत. असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केले. फॉक्सकॉनचा प्रकल्पाबाबत ही त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे

ठाकरे म्हणाले, जनतेकडून कर वसूल करायचा आणि मग म्हणायचं आम्ही हे फुकट देऊ. आम्ही ते फुकट देऊ. हे कोणतं अर्थशास्त्र ? ह्या असल्या फुकट देण्याच्या राजकारणात तात्कालिक फायदा एखाद्या पक्षाला होईल पण दीर्घकालीन नुकसान हे त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं आहे. लोकांना पाणी फुकट देणं, वीज फुकट देणं ह्या असल्या गोष्टींना माझा विरोध आहे. ‘फुकट हवं’ ह्यासाठी देशात आजपर्यंत एकही मोर्चा निघाला नाही. लोकं म्हणतात जे द्याल ते माफक दरात, मुबलक प्रमाणात आणि वेळेत द्या.
गेली कित्येक वर्ष माझी भूमिका स्पष्ट आहे… मी आणि माझा पक्ष आजही अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहे. पण स्वतंत्र विदर्भाबद्दल जनमत जाणून घ्यायचं असेल तर जसं ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटसाठी जनमत घेतलं गेलं तसा अधिकृत जनमताचा कौल घ्या. जनमत ज्या बाजूने असेल तोच अंतिम निर्णय असायला हवा. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मतदारांशी जी प्रतारणा सुरु आहे, ते अभूतपूर्व. निवडणुकीत ज्या युत्या आणि आघाड्या होतात त्या सोईस्करपणे निवडणुकीनंतर तोडल्या जातात, कशासाठी तर सत्तेच्या स्वार्थासाठी. महाराष्ट्रातील जनतेला आपण गृहीत धरू शकतो ह्याची खात्री पटल्यामुळेच हे सुरु आहे.
मी मागे पण एकदा बीएमडब्ल्यूचा प्रकल्प कसा अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे तामिळनाडूमध्ये गेला हे सांगितलं, इतकं होऊन पण राज्य सरकार काहीच शिकणार नाही का? आपण औद्योगिकीकरणात अग्रेसर आहोत ह्या भ्रमात राहू नये, इतर राज्य आता स्पर्धेत उतरली आहेत त्यामुळे महाराष्ट्राने गाफील राहू नये.
महाराष्ट्र औद्योगिकीकरणातील अग्रेसर राज्य, देशात बाहेरून कुठलाही प्रकल्प आला तर महाराष्ट्रालाच पहिलं प्राधान्य असायचं, असं असताना आता महाराष्ट्रात पूर्वीसारखे प्रकल्प का येत नाहीत? महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गेलाच कसा? ह्यात कोणी पैसे मागितले किंवा कोणाचे व्यक्तिगत हेतू साध्य झाले नाहीत म्हणून हे घडलं का, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे.
राजकीय संघर्ष करताना व्यक्तिगत संबंध आणि राजकीय भूमिका ह्यात गल्लत करू नका. राजकारणात विरोध हा मुद्द्यांना असतो, व्यक्तीला नसतो. त्यामुळे ह्यात कोणी गल्लत करू नये.



