सागर कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न सामंजस्याने सुटतोय…

कोथरुड : गेली अनेक वर्षापासून डीपी रस्त्यावरील सागर कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आला आहे. रस्ता रुंदीकरणात बाधीत होणाऱ्या घर मालकांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या असून आज काही नागरिकांनी या संदर्भातले प्रश्न माजी सभागृहनेते शंकर केमसे यांच्या माध्यमातून महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्यासमोर मांडले. The problem of road widening at Sagar Colony is solve with compromisly
यावेळी माजी सभागृह नेते शंकर केमसे, माजी नगरसेवक राजा गोरडे, नितीन गायकवाड व या भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी कदम यांनी नागरिकांच्या मागण्या समजावून घेत त्याला सकारात्मक उत्तरे दिली.
केमसे म्हणाले, सागर कॉलनी येथील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न सुटणे हे वाहतुकीच्या दृष्टीने गरजेचे होते. पण हे करत असताना नागरिकांचे प्रश्न समजावून घेत त्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे व त्यासाठी संवाद हवा होता. म्हणूनच नागरिकांचे प्रश्न प्रशासनाने समजावून घ्यावेत व त्यांच्या तक्रारींचे निरसन व्हावे यासाठी आजची बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींचे निरसन प्रशासन करत असल्याने रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागत आहे.

या संदर्भात महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम म्हणाले, रस्ता रुंदीकरणाबाबत नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. याबाबत नागरिकांचे काही प्रश्न असल्याने आज बैठक घेण्यात आली. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने या रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्यातील बाधितांचे ऋतुगंध इमारतीत पुनर्वसन करण्यात येणार आहे. परंतु काही नागरिकांनी विजयश्री इमारतीत आम्हाला घरे द्यावीत अशी मागणी केली आहे. विजयश्री इमारत ताब्यात आल्यानंतर त्यांचे त्याठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्राथमिकतेने विचार केला जाईल.