खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर,आज 1000 क्युसेकने विसर्ग होणार; नदीपात्रा लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी ( Pune) एक असलेले खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी पाच वाजता मुठा नदीत एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे धरण 100 टक्के म्हणजेच पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मुठा नदीत एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. यामुळे सोमवारी (दि.२४) सायंकाळी ५ वाजेपर्यंत या चारही धरणांत १७.२१ टीएमसी पाणीसाठा जमा झाल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याचदिवशी चारही धरणांत मिळून एकूण २०.४८ टीएमसी म्हणजे, ७०.२१ टक्के पाणीसाठा होता.
त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे खडकवासला पाटबंधारे शाखेचे शाखाधिकारी यांनी कळविले आहे.



धरणक्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांत आतापर्यंत १७.२१ टीएमसी म्हणजे ५९.०३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा धरणात जमा झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.



दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३.२७ टीएमसीने म्हणजे ११.१८ टक्के पाणीसाठा कमीच आहे. त्यामुळे शहरात दर गुरुवारी सुरू असलेली पाणीकपात आणखी काही दिवस कायम राहणार आहे. दि.१ ऑगस्टनंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.



