राहुल गांधींना ‘जीवनसाथी’मध्ये हवेत हे गुण

नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेमुळे चर्चेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या होणाऱ्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा मांडल्या आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले,”मला लग्नासाठी अशी मुलगी हवी जिच्यामध्ये माझी आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी या दोघींचे गुण असतील. अशा मुलीला मी माझी जीवनसाथी बनवण्यास प्राथमिकता देईन.” यावेळी राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल आवर्जून उल्लेख केला. माझी आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे वर्णन करताना राहुल म्हणाले इंदिरा गांधी हे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझी दुसरी आई आहे.
‘पप्पू’ हा प्रचाराचा भाग त्यामुळे वाईट वाटत नाही
विरोधकांकडून सतत राहुल गांधी यांच्या उल्लेख पप्पू असा केला जातो. यावर विचारले असता ते म्हणाले की, कोणी मला ‘पप्पू’ म्हटले तर वाईट वाटत नाही. कारण हा सर्व प्रचाराचा भाग आहे आणि असे बोलणारे स्वतःच त्रस्त आणि घाबरलेले आहेत. जो बोलत आहे त्याच्या मनात भीती आहे, त्याच्या आयुष्यात काहीच नाही, त्याचे संबंध चांगले चाललेले नाहीत. जर मला शिवी देण्याची गरज असेल तर मला शिवी द्या, मी त्याचे स्वागत करेन.
कोणाचाही द्वेष करत नाही
राहुल गांधी पुढे म्हणाले, मी कोणाचाही द्वेष करत नाही. तुम्ही मला शिव्या द्या… मी तुमचा तिरस्कार करणार नाही. या मुलाखतीत त्यांनी कार आणि बाईकबद्दल देखील सविस्तर चर्चा केली. राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्याकडे स्वतःची कोणतीही कार नाही, परंतु त्यांच्या आईकडे एक कार आहे. जेव्हा मी लंडनमध्ये राहत होतो तेव्हा मी आरएस- २० बाईक चालवायचो. ते माझ्या आयुष्यातील एक प्रेमच आहे.
सायकल, स्कूटर आवडते
मला सायकल चालवायला आवडते आणि एकेकाळी लॅम्ब्रेटा (स्कूटर) देखील माझी आवडती होती, अशी माहितीही त्यांनी दिली. आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने इलेक्ट्रिक वाहने आणि ड्रोनमध्ये भारत अजूनही मागे आहे, असेही ते म्हणाले.




