कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा : दिपाली धुमाळ

पुणे : पुण्यात कोरोनाचा संसर्ग पसरत असताना सुरवातीच्या काळात महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले होते. काही रुग्णांना तर आपले प्राण गमवावे लागले. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरीकांचे पहिल्यासारखे हाल होऊ नयेत यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा तयार ठेवावी व या संदर्भातील नियोजन व आढावा घेणेसाठी पुणे महापालिकेचे पदाधिकारी, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक तातडीने बोलविण्यात यावी अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले असून कोविड – १९ ची दुसरी लाट आल्यास त्याबाबतच्या उपाय योजना आखणेबाबतची मागणी केली आहे. गेले ९ महिन्यापासून पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग होत असून कोरोना रूग्णांची संख्या १,६५,००० हजाराहून जास्त झालेली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. परंतू परदेशात कोरोनाची दुसरी लाट येवून त्याठिकाणी लॉकडाऊन केल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच दिल्ली मध्ये देखील कोरोनाचे रूग्णवाढीचे प्रमाण वाढत आहे. त्याठिकाणी देखील लॉकडाऊन करणे विचाराधीन आहे. त्यामुळे पुण्यात रुग्ण संख्या वाढल्यास आतापासूनच यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर न मिळाल्याने रूग्णांची गैरसोय झाली होती, ही वस्तुस्थिती आहे. तसेच नर्सेस, टेक्निशियन, डॉक्टर्स व इतर आवश्यक स्टाफ यांची कमतरता असल्याने देखील रूग्णांचे हाल झाले होते. त्यावेळी ४५ दिवसांच्या कालावधीकरिता स्टाफची नेमणूक करण्यात आली होती. आता याचा देखील कार्यकाळ वाढविणेबाबत योग्य ती पावले उचलण्यात यावीत.



मनपाने कोरोनावर उपचार करणेसाठी कोविड सेंटर्स, विलगीकरण कक्ष, तसेच जम्बो सेंटर्सची उभारणी केली आहे. सदयस्थितीत मनपाचे काही कोविड सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. मागील काळात प्रशासनाकडून झालेल्या गैरसोयी यामुळे रूग्णांचे व नातेवाईकांचे होणारे अतोनात हाल पाहता कोरोनाची दुसरी लाट पुणे शहरात आल्यास प्रचंड गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.
तरी कोरोनाची दुसरी लाट आल्यास अॅम्ब्युलन्स सुविधा, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर्स या सर्व बाबी पूर्ण नियोजनासह तयार असणे अपेक्षित असून त्याचे नियोजन करण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.






