चहा एक उर्जा…एक भावना.. एक नाते प्रस्थापित करण्याचे माध्यम ; आज जागतिक चहा दिवस..

काॅफी म्हणजे प्रेम, चहा म्हणजे आयुष्य..
आज 15 डिसेंबर जागतिक चहा दिवस.
चहा ला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो हे नक्की.
असा हा चहा एक सहज उपलब्ध होणारे व बहुतांश लोकांचे आवडते पेय.
चहा एक उर्जा…एक भावना.. एक संबंध प्रस्थापित करण्याचे माध्यम. साधारणपणे तीन हजार वर्षा पुर्वी चीन मधील एका राजाने चहाचा शोध लावला. तो प्रवास करत असताना रस्त्यावर थांबून पाणी पिताना हवेच्या प्रवाहामुळे काही झाड्यांची पाने त्या पाण्यात पडली व ते पाणी पिताना एक विशिष्ट प्रकारची चव त्या पाण्याला आली व चहाची उत्पत्ती झाली असा इतिहास आहे.
आजमितीस चहा व त्याचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत..
जसे की दुधाचा चहा, साखरेचा तर मधुमेह साठी बिना साखर चहा, ग्रीन चहा..लेमन चहा..दालचिनी पावडर चहा..तर..गुळाचा चहा. ब्लॅक चहा. राजस्थान मधील,तिखट चहा तर लेह लदाख मधील लोणी घातलेला नागरोमो चहा.. बासुंदी चहा…बदाम पिस्ता चहा….इराणी चहा…..सुलेमानी चहा…..तर काश्मीरचा प्रसिद्ध काहवा चहा असे असंख्य प्रकारचे चवीचे चहा उपलब्ध आहेत.
मैत्री वाढवणारा…प्रेम वाढविणारा चहा…आनंदात पितानाचा चहा…..तर दुःखात पितानाचा चहाच. ..
काॅलेजच्या कॅन्टीन मधील चहा…तर….टपरीवरील वाफळलेला चहा…पावसात तर चहा ची तल्लख अजूनच न्हारी…..
फायदे चहाचे
चहा पेयातील कॅफेन/ टॉनिक ॲसिड मुळे स्फूर्ती मिळते.
तर काही प्रमाणात असलेल्या ॲटीजन/ ॲटीबॅक्टेरियल घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
चहा मधील अमायनो ॲसिड मुळे मेंदु ताजा ॲक्टीव राहण्यास मदत होते तर चहा मधील फ्लोराईड्समुळे हाडे बळकट बनतात…

तोटे चहाचे
अन्न तारी अन्न मारी तसे चहाचे तोटे आहेतच..
अतिरेक सर्वच गोष्टीचा वाईट. चहाच्या अती सेवनामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. दुधचा वापर वाढल्यामुळे वजन चरबीचे प्रमाण वाढते. वेळी अवेळी चहा पिल्यामुळे अन्न पचन बिघडते पित्ताचा त्रास वाढण्याची शक्यता वाढते.
काळजी
चहा जरूर प्यावा पण आपल्याला काही वैद्यकीय आजार असतील तर आधी त्या बाबतची काळजी घेऊनच चहाचा वापर करावा. सारखा सारखा उकळून तोच तोच चहा पिणे टाळले पाहीजे. कमी दुध..कमी साखर..वापर करावा, ब्लॅक चहा….ग्रीन चहाचा वापर करावा…, चहा हे खरच एक अमृततुल्य आहे, पण अतिरेक मात्र विषाचे काम करू शकते.
डाॅ.सचिन नागापूरकर
एक चहा प्रेमी अस्थीरोग तज्ञ






