नवाब मलिक यांना अटक; 3 मार्चपर्यंत ईडी कोठडीत

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
”अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू,” आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयाबाहेर आल्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळी सातपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी केली आहे. पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. “देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू” असा इशारा मलिकांनी दिला होता.



