कोथरूडमधील रस्ता मोजणीत नकाशावरून गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई..

कोथरूड : कोथरूड मधील श्री गणेश कृपा सहकारी गृहरचना संस्था पुनर्विकासासाठी मोजणी करताना सोसायटीच्या पश्चिमेकडील श्री कॉलनीतील महापालिकेने निधी टाकून तयार केलेला रहदारीचा रस्ता गायब करणाऱ्या मोजणी कर्मचारी (भूकरमापक) अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ गणेश कराड यांनी दिली.
कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक ते एकलव्य कॉलेज डिपी रस्त्यावर असणाऱ्या गणेश कृपा हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकासासाठी त्यांच्या जागेची मोजणी मोजणी कर्मचारी (भूकरमापक) सोमनाथ साळुंके यांनी केली होती. ही मोजणी करताना त्यांनी मोजणी नकाशावरून सोसायटीच्या शेजारून गेलेला महापालिकेने निधी टाकून काँक्रीटीकरण केलेला रस्ता गायब केला. नंतर रस्ता नसलेला मोजणी नकाशा सादर करून येथील बांधकाम प्रकल्प महापालिकेकडून मंजूर करण्यात आला होता.
रस्ता आत घेऊन बांधकाम करण्यासाठी संबधित बांधकाम व्यावसायिकाने पत्रे लावल्याने श्री कॉलनीतील रहिवाशांना आपला रस्ता बंद केला जात असल्याची माहिती झाली. यानंतर येथील रहिवाशी विशाल भेलके यांनी याबाबत नगर भूमापन विभागाकडे तक्रार देऊन याबत पाठपुरावा केला तेव्हा येथील श्री कॉलनीतील रस्ता मोजणी नकाशात गायब केल्याची बाब समोर आली आणि येथील रस्ता पुन्हा नकाशावर यावा यासाठी त्यांचा लढा सुरू झाला.
भेलके यांनी पाठपुरावा केल्यानंतर नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ यांनी मोजणी कर्मचारी (भूकरमापक) सागर पाटील यांना याबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते, परंतु पाटील यांनी याकडे दुर्लक्ष करत अहवाल सादर केलाच नाही त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
भेलके यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे भूमापन विभागाला पाहणी करून रस्ता गायब केलेली नकाशाची ‘क’ प्रत रद्द करावी लागली व नकाशावर गायब झालेला रस्ता दाखवून नवीन क प्रत तयार करावी लागली. परंतु हितसंबंध जोपासत हेतुपुरस्सर नकाशावरील रस्ता गायब केला गेला असून संबधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या प्रकरणात केली जात आहे.
या संदर्भात नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ गणेश कराड यांनी सांगितले की, कलम १० महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील अंतर्गत संबधित दोघांवर कारवाई केली जाणार आहे. या आधीच त्यांना खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली आहे. आता सात दिवसांची मुदत देऊन पुढील कारवाई करण्यात येईल. पुढील पंधरा दिवसात कारवाईची प्रक्रिया पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
मोजणीत रस्ता गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे, पण चुकीचा बांधकाम प्लॅन मंजूर करणाऱ्या महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.













