महाराष्ट्रातून 4 प्रकल्प निसटल्याने आदित्य ठाकरे संतापले

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर आता टाटा एअरबसचा 22 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास नाही
“खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?” असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. “खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाही हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का?” असा सवाल विचारत उद्योगमंत्र्यांच्या राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.



गुजरातच्या वडोदरामध्ये भारतीय हवाई दलाच्या सी-295 विमानाच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. टाटा एअरबस हा प्रकल्पही नागपूरच्या मिहानमधून गुजरातमध्ये हालवण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C 295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे.