‘जेएनयू’मध्ये भिंतीवर ब्राह्मणविरोधी घोषणा; विद्यापीठ प्रशासनाकडून निषेध, चौकशी सुरू

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात ब्राह्मण प्राध्यापकांच्या केबिनवर “परिसर सोडा आणि शाखेत परत जा” अशा घोषणा लिहिण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने एक निवेदन जारी करत या प्रकाराचा निषेध केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.

जेएनयूमधील इंटरनॅशनल स्टडीज विभागाच्या इमारत क्रमांक दोनमध्ये विविध ब्राह्मण प्राध्यापकांच्या कार्यालयाच्या दरवाजावर स्प्रेने या घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. नलिन कुमार मोहपात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा या प्राध्यापकांच्या केबिनवर ‘शाखेत परत जा’ अशा घोषणा कलर स्प्रेने लिहिण्यात आल्या आहेत.



भाजपशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) या प्रकारासाठी डाव्या विद्यार्थी संघटनांवर आरोप केला आहे. या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने निवेदन जारी करत विद्यापीठ सर्वांसाठी असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिक्षकांच्या केबिनवर लिहिण्यात आलेल्या या घोषणांचा निषेध करण्यात आला आहे.






