अभिनेता अविनाश खर्शीकर यांचे निधन

मुंबई : आपल्या अभिनय कौशल्याने मराठी रसिकांची मने जिंकणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. राहत्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून खर्शीकर यांची कारकीर्द चांगली गाजली. त्यांचे विनोदाचे टायमिंग अफलातून होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावला गेला आहे.
खर्शीकर यांनी १९७८ ला बंदिवान मी या संसारी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अपराध मीच केला, लफडं, सौजन्याची ऐशी तैशी, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार, आई थोर तुझे उपकार अशा नाटक व चित्रपटांमधील त्यांचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे. त्यांचे वासुची सासू हे नाटक विशेष गाजले. माझा छकुला या चित्रपटात त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर केलेले विनोदी काम रसिकांना कायम लक्षात राहील.



