आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक; आसाम पोलिसांनी कोक्राझारला नेले

अहमदाबाद : वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी गुजरातमध्ये अटक करत आसामला नेले आहे. मेवानी यांच्या अटकेनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जिग्नेश मेवानी यांना गुजरातमधील पालनपूर येथून अटक करण्यात आली. त्यांना नंतर अहमदाबादला आणून नंतर विमानाने आसामला नेण्यात आले. मेवानी यांना अटक करण्यामागील निश्चित कारण जाहीर करण्यात आले नसले तरी, त्यांच्या ट्विटमध्ये नथुराम गोडसेचा उल्लेख होता, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दिली.
मेवानी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या या ट्विटविरोधात आसाममधील कोक्राझार येथील भाजपच्या एका नेत्याने तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक गुन्हे अहवाल (एफआयआर) नोंदवत कारवाई केली. मेवानी यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, समाजामध्ये द्वेष निर्माण करणे, शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने वादग्रस्त वक्तव्य करणे या आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मेवानी यांनी १८ एप्रिलला केलेले दोन ट्विट आता काढून टाकण्यात आले आहेत. मेवानी यांच्या अटकेचे वृत्त समजताच काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर आणि इतर नेत्यांनी अहमदाबाद विमानतळावर धाव घेत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अभिनेत्री स्वरा भास्कर आणि कन्हैय्या कुमार यांनी या अटकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मेवानी हे मी आजवर भेटलेल्या सर्वात प्रतिबद्ध कार्यकर्त्यांपैकी आणि गतिमान आमदारांपैकी एक आहेत. अन्यायाविरुद्ध ते नेहमीच उभा राहिले असून उपेक्षितांपर्यंतची एकजूट त्यांनी दाखवली. ते लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. मात्र, आता जिग्नेस मेवानी यांना केवळ काही ट्विट्सवरुन अटक करण्यात आली आहे!, असे का? असा सवाल अभिनेत्री स्वरा भास्कर हिने विचारला आहे. स्वरा आणि जिग्नेश मेवानी यांनी लोकसभा निवडणुकांवेळी कन्हैय्या कुमारचा प्रचारही एकत्र येऊन केला होता.
पोलिसांनी अद्याप एफआयआरची प्रत आम्हाला दाखवली नाही. केवळ, आसाममध्ये दाखल असलेल्या काही गुन्ह्यांसदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, असे जिग्नेश यांच्या टीममधील कार्यकर्त्याने अटकेनंतर सांगितले आहे. ”गोडसेला देव मानणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील जातीय संघर्षांविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे” असे ट्विट मेवानी यांनी केले होते.
जिग्नेश मेवानी यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेकांनी ट्विटरवरुन Why असे म्हणत मेवानींना अटक का, असा प्रश्न विचारला आहे. ट्विटरवरही #JigneshMewaniArrested हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. कन्हैय्या कुमारनेही जिग्नेश यांच्या अटकेनंतर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीसोबत असा न्याय? अशी प्रश्नार्थक टीका सरकारवर केली आहे.










