महाराष्ट्र

परळी तालुक्याकडे पावसाची पाठ; शेतकऱ्यांपुढे पेरणीचे संकट

परळी : पेरणीलायक पाऊसच न झाल्याने काही जणांनी पेरणी केली नाही तर काहींनी पेरणी करूनही ती वाया गेल्याने काही शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे आहे, अशी स्थिती परळी तालुक्यात निर्माण झाली आहे.

जुलै महिन्याचा पंधरवडा संपत आला असताना ही स्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर चर्चा होईल का, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करत आहेत. पावसाअभावी विहिरींनी तळ गाठला असून जलसाठा सातत्याने कमी होत असल्याने ज्यांनी या जलसाठ्याच्या आधारे पेरणी केली आहे त्यांनाही हा जलसाठा किती दिवस पुरणार असा प्रश्न पडू लागला आहे.

पिण्याच्या, रोजच्या वापरासाठीच्या पाण्याचा आणि जनावऱ्याच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. कापूस व सोयाबीन पेरणी वाळून चालल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

इंजेगाव येथील शेतकरी पांडुरंग कराड यांनी सांगितले की, विमा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही त्यांना विमा तरी कसा भरावा, असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी विकत घेतलेले बियाणे, खत विक्रेते परत घेत नाहीत. त्यामुळे सध्या ते अनेकांच्या घरात पडून आहे. शेतकऱ्यांना सरकारने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करून त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये