विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी; कोथरूडमधील सुतारदऱ्यातील धक्कादायक घटना

पुणे: पौड रस्त्यावरील सुतारदरा परीसरात टीव्ही केबल टाकताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला केबलचा धक्का लागल्याने केबलचे काम करणारे तीन जण विजेचा धक्का बसल्याने गंभीर जखमी झाले. यामधील एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कायक घटना घडली आहे. जखमींवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आज सकाळी साडे अकराच्या सुमारास चुकीच्या पद्धतीने केबल वाहिनी टाकत असताना सुतारदरा परीसरात उच्च दाबाची विद्युत वाहिनी वरून केबलची वाहिनी टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विजेचा धक्का बसला. या घटने मध्ये तीन कामगार गंभीर जखमी झाले. यामधील एक व्यक्ती कुंडलिक शिंदे ( सुतारदरा, पौड रोड, कोथरूड)यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्वप्निल बोडके यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना जवळील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.




