पुणे शहर

भय इथले संपत नाही : अंबिल ओढा परिसर

करोडो रुपये खर्चून राडारोडा काढला तरी परस्थिती जैसे थे ; दुर्घटनेला एक वर्ष होऊनही नागरिक जगताहेत भितीत.

समस्या कायम: पडलेल्या सीमा भिंतीचा प्रश्न प्रलंबित

पुणे : मागील वर्षी २५ सप्टेंबर २०१९ ला अंबिल ओढायला पूर येऊन कात्रज, सातारा रस्ता, सहकारनगर, पद्मावती, ट्रेझर पार्क, टांगेवाला कॉलनी, तावरे कॉलनी, अंबिल ओढा, दांडेकर पूल या परिसरातील  नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत वित्तहानी बरोबर जीवितहानी सुद्धा झाली होती. या प्रकारामुळे पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या परिस्थिची आठवण प्रकर्षाने झाली होती.

ती काळ रात्र आठवली तरी अनेकांच्या काळजात आजही धडकी भरते. रात्री जोरदार मुसळधार पाऊस पडल्याने टांगेवाला कॉलनी येथील नागरीक भयभीत होऊन रस्त्यावर आले होते. नाल्याला पुराचे स्वरूप येत असल्याने आंबिल ओढ्याच्या कडेला राहत असलेल्या नागरिकांचे आजही हाल होत आहेत. अजूनही रात्रीचा जोरदार पाऊस झाला की येथील नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर येतात.

मागील वर्षी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुरग्रस्तांनी घेराव घालत राग व्यक्त केला होता. पुरग्रस्तांच्या मदतीला स्थानिक कार्यकर्ते व मंडळे मोठ्या प्रमाणात मदतीला त्यावेळी धावले होते. मात्र प्रशासन आजही उदासीन असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

येथील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आजही राडारोडा पडल्याचे पाहिला मिळत आहे. राजकीय आशीर्वादाने ओढ्या लगत झालेली अतिक्रमणे आजही जैसे थे परिस्थितीत आहेत. खरे तर प्रभागातील लोकप्रतिनिधी यांनी  मागील अनेक वर्षात महानगरपालिकामध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली. कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामावर खर्च झाला. मात्र आंबील ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे. सीमा भिंत बांधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा सोसायटीच्या सीमा भिंतीचा प्रश्न प्रलंबितच आहे. 
वर्षभरानंतर सुद्धा ही सीमा भिंत बांधण्यात आलेली नाही.

आंबिल ओढायातील राडारोडा काढून त्याच ठिकाणी टाकला असल्याचे निदर्शनास येते. गेल्या अनेक वर्षात ओढ्यातील राडारोडा काढण्यावर झालेल्या करोडो रुपयांचा हिशोब पुणेकरांना मिळणार का असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्ता बदल झाला मात्र परिस्थिती मध्ये बदल नाही . राजकीय चिखल फेक आणि शासकीय उदासीनता मध्ये अजून किती जीव जाणार..? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. लालफितीत अडकलेली खऱ्या गरजूंना मिळणाऱ्या घराची कामे कधी पूर्ण होणार याबाबात नक्की उत्तर आज देखील कोणाकडेच नाही.

जयराज लांडगे,( महाराष्ट्र नवनिर्माण सेना.)
ओढ्या लगत आजही सिमा भिंत नाही, गरिबांना अजूनही न्याय मिळाला नाही. त्यांची हक्काची घरे मिळाली नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिले होते. ते अजूनही वर्षभरानंतर प्रलंबित आहे. सरकार बदलले तरी परिस्थिती मात्र तीच आहे. ओढ्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात राडारोडा आहे. येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नैतिक जबाबदारी घेऊन काम करण्यास राज्यकर्ते व प्रशासन अपयशी ठरले आहे.- 

महेश वाबळे, (नगरसेवक भाजप.)
स्थानिक आमदारांच्या पाठापुराव्यामुळे १५२ लाभार्थी असलेल्या कुटुंबाना हक्काचे घर मिळणार आहे. प्रकल्पासाठी एस.आर.ए. आणि महानगरपालिकेने परवानगी दिली असून जिल्हाधिकारी व प्रांत यांची परवानगी मिळणे बाकी आहे. सदर कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. ट्रेजर पार्कजवळ सीमाभिंत बांधली असून नालेसफाई बाबत पाठपुरावा सुरू आहे. काही जागी राडा रोडा काढला आहे. त्यामुळेच मागील वर्षी प्रमाणे या वर्षी भयाण परिस्थिती नाही. ओढ्या लगतच्या काही अतिक्रमणे राजकीय हस्तक्षेपामुळे निघत नाहीये.

अश्विनी कदम, नगरसेविका राष्ट्रवादी.
मागील वर्षी पूर परिस्थितीनंतर प्रशासनाकडून अनेक आश्वासने मिळाली. मात्र गेल्या वर्षभरात ती आश्वासने सुद्धा पाण्यात वाहून गेल्याची सत्य परिस्थिती आहे. पूर परिस्थिती पाहण्याचे सर्वे करण्याचे काम प्राईम मूव्ह  संस्थेला देण्यात आले. मात्र त्या संस्थेने दिलेल्या कोणत्याही उपाययोजना अमलात आणल्या गेल्या नाहीत. आजही परिस्थिती जैसे थे आहे. ओढ्या लगतच्या घरांचे पुनर्वसन केलेले नाही. येथे लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत महानगरपालिका मधील भ्रष्टाचारामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. पूर येऊन पुन्हा दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का ?

रुपेश तुरे, स्थानिक नागरिक. 
पुणे महापालिका गाळ काढल्याचे सांगत आहे. परंतु आजदेखील गाळ व इतर राडारोडा तसाच पडून आहे. सीमा भिंतीचे काम पूरब न झाल्यामुळे दुर्दैवाने जर पुन्हा पूर आला तर मात्र मागील वर्षी पेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. वर्षभरात देखील सिमाभिंतीचे काम पूर्ण झालेले नाही. यातूनच स्थानिक लोक प्रतीनिधीनींची उदासीनता लक्षात येत आहे. हेवे-दावे बाजूला ठेऊन लवकरात लवकर सीमाभिंत बांधून घ्यावी.

भरत सुराणा, सामाजिक कार्यकर्ता.
आज पुराला एक वर्ष झाले. मागील वर्षाच्या त्या दिवसाची आठवण करताच डोळ्यात पाणी येते. परंतु प्रशासनाचा ठिसाळ कारभार आजही चालू आहे. आजपर्यंत त्या आंबील ओढ्याचे काम पूर्ण झालेले नाही. ज्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना परत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी दुर्घटनेने मोठी जिवित हानी  झाली होती. जनावरे मोठ्या प्रमाणात मरून पडली, लोकांचे संसार उध्वस्त झाले. रात्रभर पुर परिसरात हाहाकार उडाला होता. माणुसकीने सर्वांनी मदत तर केली; मात्र प्रशासन आजही झोपेचे सोंग घेत  आहे. नाले सफाई व योग्य काम न केल्यामुळे पुन्हा धोकादायक परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये