परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बाली येथे भेट

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांनी गुरुवारी इंडोनेशियाच्या बाली शहरात एक तास बैठक घेतली. चर्चेत पूर्व लडाखमधील सीमारेषेच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये परतण्याच्या मुद्दावरही चर्चा करण्यात आली. जी-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली.
जयशंकर यांनी ट्विट केले की, पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) दोन वर्षांहून अधिक जुन्या लष्करी प्रश्नावर चर्चा झाली.
“बालीमध्ये माझ्या दिवसाची सुरुवात चीनचे वांग यी यांची भेट घेऊन झाली. ही चर्चा एक तास चालली. सीमा परिस्थितीशी संबंधित आमच्या द्विपक्षीय संबंधातील विशिष्ट महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चेत लक्ष केंद्रित केले,” असे परराष्ट्र मंत्री म्हणाले. एकूणच संबंधांच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता ही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन करून भारत पूर्व लडाखमधील उर्वरित सर्व प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




