शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांकडून हिंगोलीतील प्राचार्यांना मारहाण

हिंगोली : शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झालेले आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ करत मारहाण केली. बांगर यांच्याबरोबच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही प्राचार्यांना मारहाण केल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले,”“या प्रकरणी गृहमंत्रालय योग्य ती कारवाई करेल. आमच्यासाठी खासदार, आमदार आणि सर्वसामान्य नागरीक सारखेच आहेत. संतोष बांगर यांनी थोडा संयम राखला पाहिजे. ते हे एका पक्षाचे आमदार आहेत. अशा घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, हे मला मान्य आहे. आम्ही त्यांच्याशी याविषयी चर्चा करू. संतोष बांगर हे आक्रमक आमदार आहेत. ते जे काही करतात, त्यांच्यामागे एक कारण असते. मागे एकदा शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या होत्या. तेव्हा त्यांनी अशा प्रकारं वर्तन केलं होतं. आताही अशाच प्रकारे काही तरी कारण असेल. मात्र, कारण कोणतंही असो, अशा प्रकारे कोणाला मारहाण होता कामा नये. यासाठी कायदा आहे”
