CCTV VIDEO : मोरबीतील पूल कोसळताना काय घडलं ते पाहा

मोरबी : मच्छू नदीवर असलेला झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. काही तरुणांनी पुलावर केलेल्या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचा दावा काही साक्षीदार करत आहेत.

सीसीटीव्हीत पुलावर तरुणांची गर्दी असल्याचं दिसत आहे. यावेळी काही तरुण फोटोशूट करत असताना, त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहे. यादरम्यान पूल हालत असल्याचंही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात.
अहमदाबादचे रहिवासी विजय गोस्वामी आणि त्यांचे कुटुंबीय या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला.



“तरुणांकडून हा पूल मुद्दाम हलवला जात असताना नागरिकांना चालणंदेखील अवघड झालं होतं. याबाबत पूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही”, अशी माहिती गोस्वामी यांनी दिली आहे.



