पुणे शहर

पुणे पालिकेच्या विरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

पुणे:  निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. पी. लक्ष्मी नरसिंहन आणि आता पत्रकार पांडुरंग रायकर तसेच पुणे शहरातील अनेक नागरिकांना उपचार व  रुग्णवाहिका यासंदर्भात येणाऱ्या अडचणीतून जीव गमवावा लागला आहे.  सातत्याने पुणे महानगरपालिकेकडे यंत्रणेत सुधारणा आणण्याच्या सूचना करून, निवेदनाद्वारे मागणी करून देखील कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. यापुढे जर योग्य उपाय योजना अंमलात आल्या नाहीत. तर राष्ट्रवादी काँगेस पार्टीकडून पुणे शहरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भातील पत्र खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, यांच्याकडून पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.  

पत्रात म्हंटले आहे की, याआधी टेस्टींग बाबतीत होणारा हलगर्जीपणा, विलगीकरण कक्षांमधील गलथान कारभार तसेच खाजगी हॉस्पिटलकडून होणारी लूट आणि आता जम्बो हॉस्पिटल मधील यंत्रणेतील निष्काळजीपणा हे सर्व पाहता पुणे हे कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे आज पुन्हा एकदा आधोरेखित झाले आहे.

पुण्यात कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढीला लागल्यापासून एक लोकप्रतिनिधी या नात्याने झालेल्या महत्वाच्या बैठकीत वारंवार आम्ही प्रशासनाला नागरिकांना भेडसावणा-या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विविध सूचना केल्या. परंतु दुर्दैवाने त्यावर अनेक मुद्यावर सकारात्मक अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. साधे बैठकांचे इतिवृत्त किंवा कार्यवाही अहवालाची माहिती देखील लोकप्रतिनिधींना पुरवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी , डॉक्टर आणि इतर कर्मचारी पिडीत रूग्णांसाठी कसोशीने प्रयत्न करत असले तरी महापालिकेच्या नियोजनशुन्य कारभारामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाही हे वास्तव आहे . प्रशासनाची अकार्यक्षमता व योग्य समन्वयाच्या  अभावामुळे वारंवार समस्या उद्भवत असल्याचे दिसत आहे . आजतागायत परिस्थितीत सुधारणा नाही – आज ही रुग्णवाहिका यंत्रणा आणि डॅशबोर्डचा अपयशीपणा अनुभवायला मिळत आहे. तर दुसरीकडे ॲाक्सिजन व व्हेंटिलेटरच्या अभावामुळे होणारे मृत्यू, विलगीकरण कक्षेतील विविध समस्यांमुळे रूग्णांची होणारी हेळसांड, वैद्यकीय सेवेवर येणारा अतिरिक्त ताण … हे विदारक चित्र पुण्याचे आहे. आम्हां लोकप्रतिनिधींची मदत घ्या. असे प्रशासनाला सांगून देखील पूर्वीच्या आयुक्तांनी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. याची फार मोठी किंमत शहराला मोजावी लागत आहे.

कोरोनाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकांमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे सादरीकरणाच्या माध्यमातून आश्वासक चित्र प्रशासनाकडून रंगवले जाते. परंतु याव्यतिरीक्त सर्वांनी सांघिक प्रयत्न करण्याची व लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची अधिक गरज आहे. प्रशासकीय नियंत्रणाच्या आभावामुळे आता अजून किती जीव जाणार ?? असा प्रश्न दिलेल्या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये