राजकीय

OBC समाज अधिकार संमेलन : फुलेंबद्दल वक्तव्यप्रकरणी कोश्यारी कॉंग्रेसच्या निशाण्यावर

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. केंद्र सरकारने मात्र त्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपालपदी कायम ठेवले आहे, अशी टीका ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

बुलढाण्यातील खामगांव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये नाना पटोलेंनी राज्यपालांनी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंबद्दल वाईट वक्तव्य केल्याचा संदर्भ देत टीका केली. पटोले म्हणाले,“केवळ महाराष्ट्राच नाही तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या देशाला दिशा देण्याचं काम केलं. आमच्या आईबद्दल म्हणजेच सावित्रीबाई फुलेंबद्दल तसेच महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल अशाप्रकारे कोणी वक्तव्य करत असेल तर ते निंदनिय आहे. कोश्यारी राज्यपालांच्या पदावर होते म्हणून नाहीतर…” असं म्हणत त्यांनी हातवारे करत इशारा केला.

याच मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला, “केंद्र सरकारला देशाची थोडी सुद्धा चिंता असती तर एका झटक्यात त्यांनी राज्यपालांना काढून टाकलं असतं. मात्र सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवी देणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रात बसून ठेवलं आहे,” असं नाना पटोले म्हणाले.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले होते?
याच मुद्द्यावरुन राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये वाद झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाच्या वेळी सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाल्यानंतर त्यांनी भाषण आटोपतं घेतलं होतं. सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये बोलताना राज्यपालांनी सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 10 व्या वर्षी झाला असं हसत हातवारे करताना सांगताना दिसले होते. “त्यांचे पती 13 वर्षांचे होते. आता कल्पना करा या वयामध्ये लग्न केलेले मुलं-मुली काय विचार करत असतील,” असं राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर “काय ते हातवारे, काय ते हसणं… सारचं किळसवाणं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलताना कोश्यारींच्या बोलण्यातून संघाची विकृत मानसिकताच दिसते. कुठे, कधी, काय बोलावं याचं भान नसणारा राज्यपाल लाभणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव,” असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं होतं. आता ओबीसी समाज अधिकार संमेलनामध्ये नाना पटोलेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर या मुद्यावरून पुन्हा टीका केल्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये