कोथरुड

कोथरुड मधील थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (शरदचंद्रजी पवार) विरोध

कोथरूड :  कोथरूडमधे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौकात महापालिकेचे मोठे सुंदर कै. तात्यासाहेब थोरात उद्यान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोथरूडकर नागरिकांना मोकळा श्वास देण्याचे काम हे उद्यान करत आहे.  लहान मुलांसाठी तर हे उद्यान आवडीचे ठिकाण आहे. परंतु या उद्यानात मोनोरेल साकारण्यासाठी पुणे मनपाच्या मोटार वाहन विभागातर्फे काही बांधकाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार)पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला आहे.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त यांना पत्र दिले असून हे मोनोरेलचे काम कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.

स्वप्नील दुधाने म्हणाले, वाढते शहरीकरण आणि मानवी जीवनात अप्रत्यक्षरीत्या समाविष्ट झालेले यांत्रिकीकरण यामुळे देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मोकळा श्वास घेणे दुरापास्त झाले आहे. आपले पुणे शहरही याला अपवाद नसून काही महत्वाची उद्याने अशा बिकट वेळी नागरिकांना दिलासा देण्याचे काम वर्षानुवर्षे करत आली आहेत.

थोरात उद्यानात नागरिकांची कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प साकारला जात असल्याने मनपाच्या मोटार वाहन विभागास भेट दिली असता निव्वळ मनोरंजन या कारणास्तव हा प्रकल्प संपन्न होत असल्याची माहिती देण्यात आली. दोन बोगीच्या या मोनोरेलमधे ४०७ मीटरचा ट्रॅक असणार आहे. यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होणार असून उरल्यासुरल्या जागेतही यांत्रिकीकरण शिरकाव होणार आहे. 

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

या प्रकल्पामुळे उद्यानातील पर्यावरणीय नुकसान तर अटळ असून याचसह मनपाने लाखो रुपये खर्च करून आजवर विकसित करण्यात आलेल्या सुविधाही हटवल्या जातील.  आजवर या सुविधांवर नागरिकांच्या कररूपी निधीतून केलेला खर्च पाण्यात जाणार आहे. एक सुजाण नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करत नैसर्गिक उद्यान चिरंतन ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचे दुधाने यांनी म्हंटले आहे.

संबधित विभागास हा प्रकल्प त्वरित थांबवण्याची सूचना केली असून असे न केल्यास भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा स्वप्नील दुधाने यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे.

Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये