लसीकरण प्रमाणपत्रावरून ‘या राज्यात’ पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार

नवी दिल्ली : कोविड लसीकरण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र मिळते ते कोविन ॲपवरून डाऊनलोड करून घ्यावे लागते. या प्रमाणपत्रावर खालच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो. मात्र आता या कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र काढून टाकले जाणार आहे. या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचे छायाचित्र हटवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर लस प्रमाणपत्रातून मोदींचे चित्र काढून टाकण्यासाठी आवश्यक फिल्टर लावणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या सात टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सरकार, उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे., “आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, या पाच निवडणूक राज्यांमध्ये लोकांना जारी करण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रांमधून पंतप्रधानांचे चित्र काढून टाकण्यासाठी आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर आवश्यक फिल्टर्स लावणार आहे,” असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.



मार्च 2021 मध्ये, आरोग्य मंत्रालयाने काही राजकीय पक्षांच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमधील निवडणुकांदरम्यान अशीच पावले उचलली होती. याआधीही कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर विरोधी पक्षनेत्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे.









