राष्ट्रीय

‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी उद्योग समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे उद्योजक गौतम अदाणी मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. असे असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपला किती रुपये दिले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्यात जवळचे संबंध आहेत, असेही राहुल गांधी यांनी संसदेत म्हटलं आहे.

“अगोदर मोदी अदाणी यांच्या विमानातून प्रवास करायचे. आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. अगोदर हे फक्त गुजरातमध्येच व्हायचे, नंतर हे भारतात सुरू झाले. अदाणी यांनी भाजपला मागील २० वर्षांत निवडणूक रोखे तसेच अन्य मार्गाने किती रुपये दिले?” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

“कोणत्याही रस्त्याने चालत जा, हा रस्ता कोणी बांधला असे विचारले, तर अदाणींचे नाव पुढं येते. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंद हेदेखील अदाणींचे आहेत. अदाणी आणि पंतप्रधान यांच्यात काय संबंध आहे, हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचे आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदाणींचे एक छायचित्र दाखवले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू

“२०१४ पूर्वी अदाणी जगातील श्रीमंताच्या यादीत ६०९ व्या क्रमाकांवर होते. पण, २०१४ मध्येभाजप सत्तेत आल्यावर अदाणी काही वर्षांतच दुसऱ्या स्थानावर पोहचले. त्यांचे आणि पंतप्रधानांचे संबंध काय आहेत? २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरू झाली. काही वर्षांतच अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचले,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये