पावसाच्या पाण्याच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची संदीप खर्डेकर यांची आयुक्तांकडे मागणी..

कर्वेनगरमधील या भागात पावसाळी पाण्याच्या नियोजनाची आवश्यकता..
कर्वेनगर : कर्वेनगर मधील समर्थ पथ,विठ्ठल मंदिर रस्त्यावरील सोसायट्या, ताथवडे उद्यान समोरील भाग येथे पावसाचे पाणी साठून जनजीवन विस्कळित होत असल्याने पावसाच्या पाण्याच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना देण्यात आले आहे. खर्डेकर यांनी म्हंटले आहे की, दोन वर्षांपासून समर्थ पथावरील प्रतिज्ञा मंगल कार्यालयासमोरील चिंतामणी, गंगानगरी, मोरयाकृपा व अन्य सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरत आहे. येथे असलेल्या सर्व दुकानांमध्ये पाणी शिरत असून थोडा मोठा पाऊस झाला की येथील सर्व भागात पाणी साचते व सोसायटी्यांचे पार्किंग पाण्याने भरून जाते व वीज मीटर खाली असल्यामुळे वीज पुरवठा देखील बंद करावा लागत आहे. याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

गतवर्षी रात्री उशिरापर्यंत थांबून आम्ही स्वतः व तत्कालीन मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी येथे पाणी उपसण्याच्या कामात लक्ष घातले होते तर यावर्षी देखील 8 जूनला अशीच परिस्थिती उद्भवली होती त्यावेळीही प्रशासनाला सतर्क केले होते.
विठ्ठल मंदिर रस्त्यावर स्नेह म्हाडा सोसायटी, कुमार परितोष सोसायटी, शहीद मेजर ताथवडे उद्यानासमोरील मधुसंचय समोरील गल्ली तील बंगले व सोसायटीत तसेच नदीपात्राजवळील राजपूत वीटभट्टी, खिलारेवाडी, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करत असली तरी यंत्रणा देखील कमी पडत आहे. शहरातील अश्या सर्व ठिकाणाची पाहणी करून पाणी साचणार नाही यासाठी काय करता येईल यावर तज्ञाचा सल्ला घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.









