भाजपचे सगळे रस्त्यावर भीक मागतात का? : संजय राऊत

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधताना सगळे पुरावे ईडीकडे देऊनही भाजप नेत्यांवर ईडी कारवाई करत नसल्याने हे सगळे रस्त्यावर भीक मागत बसले आहेत का? कुणी चणे विकतंय, कुणी भेळपुरी विकतंय, कुणी पावभाजीच्या गाड्या लावल्यात. असं काही आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.
ईडीचं मुख्यालय दिल्लीत आहे. पण काही दिवसांपासून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपविरोधी सरकार आल्यापासून त्यांचं मुख्यालय या राज्यात आणून ठेवलंय. भाजपाविरोधी पक्षांना या ना त्या कारणाने त्रास द्यायचा असं चाललंय, असं राऊत म्हणाले. श्रीधर पाटणकरांवर करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील संजय राऊतांनी यावेळी सांगितलं. “माझं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं, हे मी जगासमोर का मांडू? हा आमच्या घरातला विषय आहे. पण माझं, उद्धव ठाकरेंचं, शरद पवारांचं एकमत आहे की या दमनशाहीविरुद्ध एकत्रपणे लढायला हवं. आम्ही वाकणार नाही. आम्हाला घाई नाही, पण सगळं समोर येईल”, असं राऊत म्हणाले.
श्रीधर पाटणकरांवरच्या कारवाईमागचं सत्य तज्ज्ञ मंडळींनी समजून घेतलं पाहिजे की हे सगळं कशासाठी झालंय? चुकीच्या माहितीसाठी हे सगळं पसरवलं जात आहे. ही बदनामीची मोहीम उद्या त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. या कारवाईचं भाजपाकडून समर्थन केलं जात आहे. ही हुकुमशाहीची नांदी आहे, असं देखील राऊत म्हणाले.




