नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

मुंबई : शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालयानेही नितेश राणे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान कोर्टाने मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे.नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तरी सर्वोच्च न्यायालयात त्यांना या आदेशाला आव्हान देता यावे तोपर्यंत त्यांना कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने केली. यावेळी नितेश राणे यांना कठोर कारवाईपासून 27 जानेवारीपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष सरकारी वकिलांनी सरकारने एका आठवड्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे नितेश राणेंना 27 जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे.




