महाराष्ट्र

मुंबईत चाचण्या वाढवण्याची फडणवीसांची मागणी

मुंबई : मुंबईत सातत्याने वाढत असलेला मृत्युदर पाहता चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज केली आहे.
सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पुढे त्यांनी पत्रात काही आकडेवारी जाहीर केली आहे त्यामध्ये  जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन ६५७४ चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा ४.९१ टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत प्रतिदिन ७००९ चाचण्या करण्यात आल्या  या १७ दिवसांचा  मृत्यूदर ५.४० टक्के इतका झाला आहे. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन ७००० चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे.
 देशाचा मृत्युदर आता १.९२ टक्‍क्‍यांवर आला आहे. असे असताना मुंबई चा मृत्यू दर सातत्याने ५ टक्क्यांच्या वर असणे हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्राचा मृत्युदर जून महिन्यात ५.२० टक्के इतका होता. तो जुलै महिन्यात २.८९ टक्के झाला आहे. आणि आता ऑगस्टच्या १७ दिवसात तो २.८९ टक्के इतका पुन्हा कायम आहे.
आतापर्यंतच्या एकूण सर्व आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्राचा मृत्युदर हा ३.३५ टक्के इतका आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता देशातील संसर्गाचे प्रमाण हे ८.८१ टक्‍के इतके असून ते महाराष्ट्रात १८.८५ टक्के तर मुंबईत १९.७२ टक्के इतके आहे एकीकडे संसर्गाचे प्रमाण अधिक आहे आणि दुसरीकडे सातत्याने वाढणारा मृत्यूदर पाहता चाचण्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणे, रुग्ण ओळखणे त्यातून विलगीकरण आणि अन्य नागरिकांना सुरक्षित ठेवणे हा एक मात्र उपलब्ध पर्याय असल्याने मुंबईत चाचण्या वाढवण्याची नितांत गरज आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात ही विनंती फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये