कोर्ट, न्यायाधीश याचं काम मोदींना मदत करणं नाही तर योग्य न्याय करणं : ओवैसी

नवी दिल्ली : बिल्कीस बानो मुस्लिम नसती तर एव्हाना तिला न्याय मिळाला असता. बिल्कीस बानो मुस्लिम आहे म्हणून तिला न्याय मिळालेला नाही. २० वर्षे ती न्याय आणि हक्कांसाठी लढते आहे. कोर्ट असोत किंवा न्यायाधीश असोत त्यांचं काम मोदींना मदत करणं नाही तर योग्य न्याय करणं आहे, अशा शब्दांत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत म्हटलं आहे. हिंडेनबर्ग भारतात असतं तर UAPA लागला असता, असा टोलाही त्यांनी लगावला.
मी मुस्लिम आहे माझ्याशिवाय हा देश अधुरा आहे. आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनवर का बोलत नाहीत? मुस्लिम म्हटलं की तुम्हाला हिरवा रंगच का दिसतो? असंही ओवैसी यांनी विचारलं आहे. या सरकारने इंदिरा गांधींकडून धडा घेतला पाहिजे त्या म्हणत असत की न्यायव्यवस्था ही माझी शक्ती आहे. मोदी सरकार म्हणतं आहे की न्यायव्यवस्थेने आमच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. जे ख्रिश्चन धर्म मानतात ते पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहेत का? असाही प्रश्न ओवैसी यांनी विचारला.
न्याय व्यवस्था मोदींना मदत का करते आहे? त्यांनी योग्य न्याय केला पाहिजे. गरीब आणि बेरोजगारांचे प्रश्न कुणी निर्माण केले आहेत? अल्पसंख्याक शब्दाला जन्म कुणी दिला? कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला. आपल्या देशात मुस्लिमांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजे. कोर्ट असोत किंवा न्यायाधीश असोत त्यांचं काम मोदींना मदत करणं नाही तर योग्य न्याय करणं आहे असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारला सांगेन की अल्फाबेट A हे तुमच्यासाठी अशुभ आहे. तुम्ही अदाणी यांना कंत्राटं दिली आता त्यांची अवस्था काय झाली आहे बघा. हिंडेनबर्ग जर भारतात झालं असतं तर UAPA लागला असता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जाताना महात्मा गांधींचं नाव घेतात असंही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा असे रंग आहेत. आपण या झेंड्याला तिरंगा असंही म्हणतो या तिरंग्यातून मोदी सरकार हिरवा रंग हटवणार आहेत का? असा सवाल AIMIM चे खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. संसदेत बोलत असताना त्यांनी हा प्रश्न विचारला आहे तसं मोदी सरकारला हिरव्या रंगाचं एवढं का वावडं आहे? असंही ओवैसी यांनी विचारलं.
सरकारने जर तिरंग्यातून हिरवा रंग काढून टाकला तर ते कलिंगडावरही बंदी घालणार का? फक्त नागपूरचं संत्रंच खाल्लं जावं असा आदेश काढणार का? असेही प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले. आपल्या देशातल्या लोकसंख्येचा भाग ज्या अल्पसंख्याकांनी व्यापला आहे त्या अल्पसंख्याक वर्गाबाबत आम्ही राष्ट्रपतींच्या भाषणात एक ओळही ऐकली नाही असंही ते म्हणाले. तसंच मुस्लिमांना कायमच हिरव्या रंगाशी जोडलं जातं तुम्ही कशा कशावर बंदी घालणार असाही प्रश्न त्यांनी विचारला.
पैसे खाऊन पळून गेले त्यात एकही नाव मुस्लिम नाही
जो अर्थसंकल्प केंद्र सरकारने नुकताच सादर केला त्यातही अल्पसंख्याक वर्गाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं आहे. अल्पसंख्याक खात्यासाठी करण्यात आलेली तरतूद ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के कमी आहे असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. जे लोक प्रचंड संपत्ती घेऊन आपल्या देशातून पळून गेले आहेत त्या यादीत मुघलांचं नाव आहे का बघा. पण तुम्ही त्याबाबत कधीही काहीही बोलणार नाही, सोयीस्कर मौन बाळगणार असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. आपल्या भाषणात पुढे ओवैसी म्हणाले की जे लोक पैसे खाऊन पळून गेले त्यात एकही नाव मुस्लिम नाही.



