राष्ट्रीय

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा राष्ट्रपती पदाचे विरोधी पक्षांच्या वतीने उमेदवार

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी उमेदवार निश्चित केला आहे. एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि सध्याचे ममता बॅनर्जी यांचे विश्वासू यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. भाजपनं एनडीएच्यावतीनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत यशवंत सिन्हा यांचं नाव निश्चित करण्यात आलं. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी देखील यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे. आम्ही राष्ट्रपती पदासाठी एकमतानं उमेदवार निवडला आहे. सर्व पक्षांनी यशवंत सिन्हा यांनी मतदान करावं, असं आवाहन जयराम रमेश यांनी केलं आहे.

विरोधी पक्षांनी संयुक्तपणे प्रसिद्धीपत्रक जारी करत भाजपनं यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं आहे. चांगला राष्ट्रपती मिळावा म्हणून यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन विरोधी पक्षांनी केलं आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांची आघाडी या पुढे देखील कायम असेल, असं म्हटलं. भाजपनं राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करण्यात आले नाहीत, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी नाव जाहीर होण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यशवंत सिन्हा यांनी यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं. आता विरोधी पक्षांनी त्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संधी दिली आहे.

यशवंत सिन्हा यांची राजकीय कारकीर्द

यशवंत सिन्हा हे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. १९८४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जनता दलामध्ये प्रवेश केला. १९८८ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. ११९३ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २००४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं सरकार गेल्यानंतर २००५ पासून भाजपमधून त्यांना दुर्लक्षित करण्यात आलं. यशवंत सिन्हा यांनी तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून काम केलं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात यशवंत सिन्हा वित्त मंत्री होते. २०१८ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजप सोडली. पुढे त्यांनी राष्ट्रमंच संघटनेची स्थापना केली. यशवंत सिन्हा यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये