राजकीय

Budget 2022 : विकून खाणे हेच धोरण; बाळासाहेब थोरातांची अर्थसंकल्पावर टीका

मुंबई : सरकारी पैशांतून उभ्या राहिलेल्या व्यवस्था विकायच्या हेच मागील सात वर्षांत सुरू आहे आणि तेच भविष्यातही सुरू राहणार आहे. आजच्या अर्थसंकल्पानं यावरच शिक्कामोर्तब केलं आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढविणे यापलीकडे केंद्र सरकारकडे दुसरे काही धोरण नाही. मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत सादर केलेले अर्थसंकल्प पाहिल्यास ते कायमच अर्थसंकल्पातून भविष्याची स्वप्न दाखवत आले आहेत. मात्र गेल्या सात वर्षांत काय केले हे सांगत नाही.

स्मार्ट सिटीची काय स्थिती? स्मार्ट सिटी, सांसद आदर्श ग्राम योजनेची काय स्थिती आहे? यावर सरकार गप्प आहे. मुद्रा लोन, स्टार्टअप योजना याविषयी यापूर्वी केलेल्या घोषणांवर सरकार बोलत नाही. गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचे काय झाले ते ही अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही. आता डिजिटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे. हा अर्थसंकल्प सर्व वर्गांची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

कोविडच्या संकटामुळं देशातील जनता मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. छोटे उद्योजक, हातावर पोट असणारे गाव खेड्यातील व्यावसायिक यांची स्थिती अत्यंत कठीण झाली आहे, त्याबाबत केंद्र सरकारकडं कोणतंही धोरण दिसत नाही. कोविडमध्ये जीव गमवावा लागलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांपर्यंत केंद्र सरकार सरसकट मदत करेल अशी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होती, त्याबद्दल चकार शब्दही अर्थमंत्र्यांनी काढला नाही, असं थोरात यांनी सांगितले आहे.

बेरोजगार तरुणांच्या डोळ्यात धूळफेक बेरोजगारी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे, दुसरीकडे रोजगार निर्मितीचं स्वप्न दाखविलं जात आहे. आहे त्या नोकऱ्या टिकविण्यासाठी सकारात्मक धोरणाचा अर्थसंकल्पात अभाव दिसतो. देशातील बेरोजगारी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचली असताना ती कमी करून तरुणांना रोजगार देण्याबाबत कोणताही ठोस रोडमॅप तयार न करता केवळ घोषणा करायची म्हणून 60 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा करून बेरोजगार आणि तरुण मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये