केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात वाढ

पुणे : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 31 टक्के तरतूद होती. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईपासून वाचवण्यासाठी महागाई भत्ता घटक त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोडण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के डीए मिळतो. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारने डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आता 34 टक्के होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, सरकार वर्षातून दोनदा डीएमध्ये सुधारणा करते. यापूर्वी, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.




