दिल्ली महानगरपालिका निवडणूक :
आपकडून भाजप पराभूत

नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्ये होती.
या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.
‘आप’ला एकतर्फी यश मिळाले नसले तरी, २५० प्रभागांपैकी १३४ प्रभाग जिंकून बहुमताचा आकडा पार केला. ‘आप’विरोधातील थेट लढतीत भाजपला १०४ प्रभागांमध्ये विजय मिळाला. काँग्रेस आणखी क्षीण झाला असून फक्त ९ प्रभाग मिळवून हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
भाजपच्या कामगिरीचे आश्चर्य
भाजपने दिल्ली सरकारमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने मांडला. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर उत्पादन शुल्क घोटाळय़ाचा आरोप केला. केजरीवाल व सिसोदिया यांनी मद्यधोरण बदलून पैसा कमावल्याचाही दावा भाजपने केला. तिहार तुरुंगात असलेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन मौजमजा करत असल्याचा दावा करणाऱ्या चित्रफिती ‘लीक’ केल्याचा आरोप ‘आप’ने केला होता. मात्र, ‘आप’च्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा मतदारांना पटवून देण्यात भाजप नेते अपयशी ठरले.
प्रचाराचा फौजफाटा प्रभावहीन
भाजपचे डझनहून अधिक केंद्रीय मंत्री, भाजपचे ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शंभराहून अधिक पदाधिकारी हा प्रचारातील फौजफाटा तुलनेत प्रभावहीन ठरला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, नितीन गडकरी, भागवत कराड असे सुमारे दीड डझन मंत्री वॉर्डा-वॉर्डात जाऊन मतांचा जोगवा मागत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्लीत प्रचार केला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भाषणे-रोड शो झाले. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह दिल्लीतील भाजपचे सर्व म्हणजे सातही खासदार दिवसरात्र घरोघरी जाऊन ‘डबल इंजिन’चा मुद्दा मतदारांना पटवून देत होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय सचिव, माजी केंद्रीय मंत्री, दिल्लीतील भाजपचे नेते, केंद्रीय तसेच राज्य भाजपचे शेकडो पदाधिकारीही प्रचार करत होते.




