कोल्हापूरला परत जाणार चंद्रकांत पाटील यांची खळबळजनक घोषणा
पुणे: कोल्हापूर सोडून पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
शुक्रवारी पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
कोल्हापुरातून निवडून नाही आलो तर हिमालयात जाईन; चंद्रकांतदादा कडाडले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढली. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले होते.
मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले होते.