या योजनेच्या बचतीतून मुलीला देऊ शकता 65 लाखांची रक्कम

पुणे : तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी चिंता करीत असाल अथवा योजना आखत असाल, तर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुम्ही तिला खास भेट देऊ शकता. एका योजनेत थोडे-थोडे पैसे गुंतवून तुम्ही तुमच्या मुलीसाठी लाखो रुपये जमा करून तिचे भविष्य सुरक्षित करू शकता.
या योजनेत तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळणार आहे. या सरकारी योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना आहे. या योजनेद्वारे बचत करून तुम्ही तुमच्या मुलीला कसे 65 लाख रुपये देऊ शकता याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. यासाठी तुम्हाला दररोज 416 रुपयांची दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल. तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. या योजनेत तुम्हाला 7.6 टक्के परतावा मिळेल.
तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला पोस्ट ऑफिस अंतर्गत खातं उघडावे लागेल. 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्याची परवानगी आहे. यामध्ये वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर ही योजना परिपक्व होते. मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेत गुंतवलेल्या रकमेच्या 50 टक्के रक्कम काढता येते. एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींना लाभ घेता येतो. एका कुटुंबात जुळ्या मुली असल्यास 3 मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. मॅच्युरिटीला तुम्हाला किती रक्कम हवी आहे याचा विचार करून गुंतवणूक करावी.
65 लाख रुपये कसे मिळवाल
मुलगी एका वर्षांची असेल आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल. तर दररोज 416 रुपये खात्यात जमा करा. त्यामुळे महिन्याला 12,500 रुपये जमा होतील. म्हणजेच ही रक्कम या योजनेत दरमहा जमा केली तर वर्षभरात 1,50,000 रुपये जमा होतील. त्याच वेळी 15 वर्षांत ही गुंतवणूक 22,50,000 रुपये होतील. 7.6 टक्के व्याज दराने एकूण व्याजाची रक्कम 42,50,000 रुपये असेल. मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिला परिपक्वतेवर 65,00,000 रुपये मिळतील.
( तुम्हाला आमच्या बातम्या, माहिती आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.)




