स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात आत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाई आणि इतर मुद्द्यांवरून आंदोलन छेडले आहे. या दरम्यान आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री स्मृती इराणी परत जात असताना त्यांच्या गाडीच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीने अंडी फेकून मारली. विशाखा गायकवाड असे या कार्यकर्तीचे नाव असून पोलिसांनी तिला अंडीफेक केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
बालगंधर्व रंगमंदिर चौकीच्या परिसरात ही घटना घडली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी(Smriti Irani) यांना काँग्रेसच्या विरोधालाही सामोरं जावं लागलं. पुणे शहर महिला काँग्रेसने देशातील वाढत्या महागाईच्या कारणावरून आंदोलन केले. देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. मात्र पोलिसांनी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला मंत्री स्मृती इराणी पुण्यात आल्या आहेत. हे कळताच कार्यक्रमस्थळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पोहोचल्या, आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात ‘हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई!, जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी।, क्योंकि गॅस भी कभी सस्ती थी, स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.
देशातील महागाईच्या विरोधात लढताना व जनतेचे प्रश्नांवर काम करतांना पोलिसांनी अशा प्रकारे ताब्यात घेणे निषेधार्ह आहे. जनतेच्या प्रश्नांवर पोलिसांनी अशाप्रकारे शंभरवेळा जरी अटक केले तरी आम्ही तयार आहोत, असं यावेळी पुणे शहर महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद म्हणाल्या.



