पणती लावून बसमध्येच झोपलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : लक्ष्मीपूजनाच्या रात्री बसमध्ये पणती लावून झोपलेल्या चालक आणि वाहक अशा दोघांचा बसला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला. झारखंडमधील रांचीत खडगर्हा बसस्थानकात ही घटना घडली आहे.

लक्ष्मीपूजनाच्या रात्री दोघेही बसमध्ये पणती लावून झोपले होते, त्यानंतर आग लागली. ही बस सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या इच्छित स्थळी रवाना होणार होती. यामुळे वाहन चालक व वाहक यांनी लक्ष्मीपूजनाच्या रात्री बसच्या आतच पूजा केली. यावेळी देवाच्या मूर्तींसमोर दिवे लावून त्यांनी नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर दोघांनीही जेवण केले. काही वेळाने दोघांनाही गाढ झोप लागली. त्याच वेळी बसमधील जळत्या दिव्याच्या ज्योतीने आग पेटली आणि काही मिनिटांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली.



आग वेगाने भडकल्यामुळे चालक आणि वाहक यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि दोघंही जिवंत जळाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक निघाले, परंतु ते पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही अर्धवट जळालेले मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले.























































































