भाजपने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने…; कोल्हापूरमधील पराभवानंतर भाजपची प्रतिक्रिया

कोल्हापूर : “काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली. भाजपने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ दोन्ही गमावले.” अशा प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर दिली आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव असून, काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 19 हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली. “कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली. परंतु मतांचे गणित पाहायला गेले तर २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा मिळून ७५ हजार मते पडली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली होती. मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे. शिवसेनेची हक्काची ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत. तर भाजपाची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये केवळ फूट नाही तर हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारलं आहे आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा #EVM वरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे.” असं देखील केशव उपाध्ये यांनी म्हटलेलं आहे.







