कोथरूड मध्ये कचरा वर्गीकरण जनजागृती मोहीमेतून संत गाडगे महाराज जयंती साजरी

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाचा उपक्रम
कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने “मानवतेचे पुजारी, कर्मयोगी लोकशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ, स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून “स्वच्छ भारत अभियान, सर्वेक्षण मिशन २०२३” अन्वये प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरात कचरा वर्गीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
प्रभागातील लक्ष्मीनगर व श्रावण धारा झोपडपट्टीतील नागरिकांना ओला आणि सुका, सॅनिटरी पॅड व हागीज, ई बेस्ट व प्लास्टिक वेस्ट तसेच हजर डस्ट अशा प्रकारे कचरा वर्गीकरण करण्याच्या संदर्भात या मोहीम अंतर्गत जनजागृती करण्यात आली. कचरा वर्गीकरण करणे ही मोहीम पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवाणी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, सेवा सहयोग फाउंडेशन, हर्षदीप फाउंडेशन इत्यादी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आली. लक्ष्मीनगर मध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरण मोहीमेत कचरा वर्गीकरणाचे पत्रके घरोघरी वाटून जनजागृती करण्यात आली.










या भागात काम करणारे व कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे ब्रँड अँबेसिडर मोकादम वैजीनाथ गायकवाड जनजागृतीपर कार्यक्रमात प्रबोधन करताना असे म्हणाले की,” विशेषतः झोपडपट्टीच्या ठिकाणी स्वच्छतेची जनजागृती पर विविध कार्यक्रम राबवून लोकांमध्ये कचरा वर्गीकरण, पर्यावरण पूरक सण साजरे करणे, पर्यावरण पूरक किल्ले स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय स्वच्छ कसे ठेवावे याविषयीच्या स्पर्धा, स्वच्छतेच्या संदर्भातील विविध प्रश्न उत्तरे स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्सानात्मक बक्षिस देऊन विविध पैलू द्वारे झोपडपट्टीतील महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरातील झोपडपट्टीतील नागरिकांना एक आदर्श व जागरूक उदाहरण म्हणून कोथरूड भागातील लक्ष्मीनगर व श्रावण धारा झोपडपट्टीकडे पाहता येईल.
अबाल वृद्ध महिला, तरुण मुलमुली व ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहून ओला आणि सुका कचरा वेग वेगळा करून महानगरपालिकेच्या स्वच्छ सहकारी संस्थेला देतात. या नागरिकांचा आदर्श घेऊन पुणे शहरातील सर्व झोपडपट्टीतील नागरिकांनी अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण केले तर आपले पुणे शहर कचरा मुक्त होईल. डहाणूकर कॉलनी लक्ष्मी नगर मधील बैठी घरांची संख्या १०६७ असून सदर ठिकाणी ७५० किलो ओला कचरा व ४५० किलो सुका कचरा असा एकूण एक टन २०० किलो कचरा स्वच्छ सहकारी संस्थेच्या माध्यमातून जमा होतो.
लक्ष्मी नगर भागातील भौगोलिक परिस्थिती डोंगर उतार व लहान लहान गल्लीबोळाचा असल्यामुळे तेथील कचरा जमा करणे हे एक मोठे आव्हान आहे तरी देखील आम्ही या सर्व स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जनजागृती मोहिमा राबवून गांधीगिरीच्या माध्यमातून व दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून कचरा न देणाऱ्या व वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांवर कारवाया देखील केलेल्या आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिक हा ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण अगदी व्यवस्थित करत आहेत. तसेच स्वच्छ सहकारी संस्थेच्या सेवकाला शुल्क देखील व्यवस्थित दिला जातो त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांनी महानगरपालिकेने मान्यता दिलेल्या स्वच्छ सहकारी संस्थेच्या कचरा जमा करणाऱ्या सेवकाला वर्गीकृत कचरा देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.



वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी स्वच्छ सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्याला सक्त सूचना दिल्या की,” कोथरूड भागातील सर्व झोपडपट्टीतील नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व पुणे महानगरपालिकेच्या सफाई सैनिकांनी कचरा वर्गीकरण करणे व स्वच्छतेच्या संदर्भात अनेक प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत असणारे सर्व क्रॉनिक स्पॉट बंद झाले पाहिजे त्यासाठी सर्वांनी मिळून अहोरात्र झटून संत गाडगेबाबा महाराजांच्या स्वप्नातील आपला भारत स्वच्छ भारत सुंदर भारत व आपले आरोग्य गाव परिसर स्वच्छ आणि सुंदर घडवूया आणि पुणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण – २०२३ मध्ये एक नंबर येण्यासाठी प्रयत्न करूया असे आव्हान केले.
ही जनजागृती मोहीम कार्यक्रम कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार व सचिन लोकरे यांच्या निरीक्षणाखाली मुकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, सेवक परेश कुचेकर, कुणाल जाधव, जनवानीचे समीर आजगेकर, जयश्री पाटील, सेवा संयोग फाउंडेशनचे युवराज चाबुकस्वार, महेश, हर्षदीप फाउंडेशनच्या ज्योती बेंडाळे, दीक्षा गवस, स्वच्छ सहकारी संस्थेचे नितीन मदने, निता परदेशी, जगन्नाथ ढगे, अमोल गायकवाड इत्यादींनी परिश्रम घेतले.



