महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशन : भास्कर जाधवांनी केली मोदींची नक्कल

मुंबई : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी विधानसभा डोक्यावर घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावर आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशी मागणी केली. पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. यासाठी भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांच्या शैलीत त्यांची वाक्य बोलून दाखवली. हे पाहून फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे फडणवीस यांनी म्हटले. नरेंद्र मोदी यांनी ते वक्तव्य पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असा अर्थ होऊ शकतो. यानंतरही भाजपच्या आमदारांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. त्यावर भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे म्हटले. मात्र, अंगविक्षेप मागे घेण्याचे कोणतेही आयुध उपलब्ध नाही. भास्कर जाधव अजूनही हा विषय थट्टेने घेत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा वापर करुन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु, त्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरुच राहिल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Img 20211129 wa0128

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये