वसंत मोरे यांना ‘शिवतीर्थ’वरून बोलावणं, राज ठाकरेंची भेट घेणार

पुणे : मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात मनसेच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतलेले नगरसेवक वसंत मोरे सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी त्यांना सांगितले आहे.
मोरे यांना अखेर शिवतीर्थवरुन बोलावणे आले आहे. त्याआधी वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी वसंत मोरे यांनी गुरुवारी रात्री राज ठाकरे यांना मोबाईलवरून मेसेजही पाठवला होता. मात्र, राज ठाकरे यांनी त्या मेसेजला कोणताही रिप्लाय दिला नव्हता. मात्र, त्यानंतर काही वेळातच मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा निरोप दिला. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले. त्यामुळे आता सोमवारी शिवतीर्थवरील बैठकीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
बाबू वागस्कर म्हणाले की, मी याठिकाणी माझ्या पक्षाच्या सरचिटणीसाला भेटायला आलो आहे. हा आमचा कुटुंबाचा प्रश्न आहे. तो चर्चा करून मिटवला जाईल. आम्हाला पक्षाने खूप काही दिले आहे. ज्यांनी आम्हाला नावारुपाला आणलं त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आमच्यातील कोणीच काही निर्णय घेणार नाही. वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. त्यामध्ये वादाचे कारण नाही. मनसेत एखाद्याला पद देताना मागच्या पदाधिकाऱ्याला विचारले जात नाही. ही प्रक्रिया आहे. वसंत मोरे यांची निवड झाली तेव्हा अजय शिंदे यांनाही विचारण्यात आले नव्हते. आताही वसंत मोरे मनसेचे सरचिटणीस आहेत, ते देखील मोठं पद आहे. वसंत मोरे यांचं राज ठाकरे यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यांना आपल्या भावना वेगळ्या पद्धतीने मांडायच्या होत्या. पण अर्थाचा अनर्थ झाला, असे बाबू वागस्कर यांनी सांगितले.




