कोल्हापुरात भाजपचा टप्प्यात कार्यक्रम; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला तर भाजपच्या सत्यजित कदम यांचा दारुण पराभव झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जयश्री जाधव या 92012 इतक्या मतांनी विजयी झाल्यात तर भाजपच्या सत्यजित कदम यांना 73147 इतकी मत मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानावा लागणार आहे.
महाविकास आघाडी विरोधात भाजप अशा अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला गड राखण्यात यश आले आहे. आक्रमक प्रचार आणि नेत्यांची फौज मैदानात उतरवूनही विजय न मिळाल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातो. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आशीर्वादानंतर कोल्हापुरातही अंबाबाईचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला होता. पण या निवडणुकीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.
या पोटनिवडणुकीसाठी राज्य पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांची जोरदार प्रचार फौज उतरली होती. आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं होतं. अशात पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निकालाचा नक्कीच 2024च्या निवडणुकांवर परिणाम पाहायला मिळेल. काँग्रेस उमेदवार उत्तर कोल्हापुरात निवडून आल्यामुळे 2024 मध्ये काँग्रेस या जागेवर आपला हक्क सांगू शकते.







