शिवसेनेच्या प्रतोदपदी खासदार राजन विचारे, भावना गवळींची उचलबांगडी

मुंबई : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेना सावध झाली आहे. यामुळे शिवसेनेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत असून, आता याअंतर्गत राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. पत्रात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते. यामुळे भावना गवळीही पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळेच शिवसेनेने भावना गवळी यांची उचलबांगडी करीत लोकसभेतील प्रतोद पदावरून हटविले..शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना पत्र लिहित शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करावी असे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. त्यानंतरच शिवसेनेकडून भावना गवळी यांना हटवण्यात आले. संजय राऊत यांच्या लेटरहेडवरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.



